ब-याच दिवसांनी नारळाच्या वड्या आणि वडपे पोहे करण्याचा योग आला. मी तर करून बघितले. हो! आणि चांगला रिमार्कही मिळालाय ... मला वाटते की तुम्हीही ही कृती एकदा करुनच बघायला हवी ... कदाचित तुमच्याही कानी ... असो! तर फटाफट ही कृती करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा ...
नारळाच्या वड्या :
साहित्य : २ वाटया नारळाचा चव, २ वाटया साखर, १ वाटी दूध, वेलदोडे आवडीप्रमाणे
कृती : नारळाचे खोबरे ख़वून घ्यावे. खोबरे मिक्सर मधून फिरवून घ्यावे. नारळ खवताना फ़क्त पांढरे खोबरेच घ्यावे. खोब-याची पाठ घेऊ नये. म्हणजे वड्या स्वच्छ होतात.
एका जाड बुडाच्या पातेल्यात दोन वाटया मिक्सर मधले खोबरे, दोन वाटया साखर व एक वाटी दूध घालावे. ते एकत्र करून शिजवावे. मिश्रण चांगले घट्ट होत आले की त्यात वेलदोड्याची पूड घालावी. तूप लावलेल्या ताटात मिश्रण थापावे व लगेचच वड्या कापाव्यात.
नारळाच्या वड्यात रोझ इसेन्स व थोड़ा गुलाबी रंग घातला की वड्यांना चांगला स्वाद व रंग येतो.
वड्या जर काळपट वाटल्या तर त्यात खाण्याचा पिवळा रंग टाकावा.
आता बघुयात वडपे पोहे करण्याची पद्धत :
साहित्य : १ वाटी नारळ खवून घ्यावा, वाटीभर बारीक चिरलेला कांदा, वाटीभर बारीक चिरलेला टोमँटो, अर्धावाटी चिरलेली कोथिंबीर, थोड्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात, पातळ पोहे, चवीपुरते मीठ, साखर, फोडणीचे साहित्य (तेल, मोहरी, हिंग), लिंबाचा रस आवश्यकतेनूसार.
कृती : नारळाचे पाणी पातेल्यात घ्यावे. त्यात नारळाचा चव व सर्व साहित्य एकत्र करावे व त्यात मावतील एवढे पोहे घालून सारखे करावे, चवीला मीठ, साखर घालून लिंबू पिळावे. वरून फोडणी करून पोह्यावर ओतावी.
हो! टेस्ट केल्यानंतर अभिप्राय द्यायला मात्र विसरु नका बरं का?