Social Icons

Pages

Friday, March 2, 2012

Murraya Koenigii Chutny (कढीलिंबाची चटणी)

प्रिय गृहिणिंनो,

साधी आमटी करतांना फोडणीला चार कढीलिंबाची पानं आणि वरून थोडीशी कोथिंबीर पेरली तर आमटिची चवच बदलून जाते. खरंतर कढीलिंब (Murraya Koenigii) काय किंवा कोथिंबीर, पुदीना, तमालपत्र काय हे कुठलंही पान जेवणात आलं तर बाजूला काढून टाकलं जातं. पण ही पानं जर स्वयंपाकात नसतील तर जेवणाची लज्जत देखिल कमी होइल. कढीपत्त्याचा अपवाद सोडला तर ही पानं ही काही फ़क्त आपलीच मक्तेदारी नाही तर जगभरात सगळीकडे या पानांचा पदार्थाची चव वाढविण्यासाठी, पदार्थाला सुगंधी करण्यासाठी केला जातो.

Murraya Koenigii Chutnyकढीलिंब (Murraya Koenigii) मात्र भारताची खासियत! कढीपत्त्याशिवाय आपल पान हालत नाही. कढीलिंब देखील पोटात गेला पाहिजे. यातून व्हिटामीन 'ए' आणि कँल्शीयम मिळतं. आयुर्वेदात कढीलिंबाचा औषधासाठी देखील वापर केला जात असे. कढीलिंबाची पानं आणि मीरं एकत्र वाटून जर अंशापोटी घेतलं तर म्हणे ते (Murraya Koenigii on Diabetes) मधुमेहावर गुणकारी आहे. तसंच उलट्यांचा त्रास होत असेल तर कढीलिंबाची भाजलेल्या पानांची पूड करून खाल्ली जात असे. पानांचाच नाही तर कढीलिंबाच्या मुळांचा आणि खोडाचा देखील पोटाच्या विकारावरिल औषधात तसेच टाँनिकमध्ये वापर केला जात असे. आज याचा वापर केला जातो किंवा नाही याची मात्र मला कल्पना नाही.

आपल्याकडे पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर कुठेही गेलं तर कढीलिंबाचा स्वयंपाकात वापर अपरिहार्य आहे. असं म्हटलं जातं की रानात फोफावणा-या या झाडाच्या सुगंधाकडे आकृष्ट होउन माणसानं पानं काढून खाऊन बघितली. पण नुसत्या पानांची चव काही चांगली लागेना. योगायोगाने ही पानं दुस-या पदार्थात मिसळली असता त्या पदार्थाची चव वाढते हे लक्षात आलं आणि आपल्याकडे कढीलिंबाचा वापर सुरू झाला. आपल्याकडून कढीलिंब श्रीलंका, मलेशिया ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत पोहोचला आणि तिथल्या स्वयंपाकात देखील महत्वाचं स्थान मिळवलं. श्रीलंकेत चिकन आणि बीफ करिजमध्ये कढीलिंब वापरला जातो. भारतीय क्विझिनने (Indian Cuisine) जगभर लोकप्रियता मिळवली आहे तेव्हा आपल्या मसाल्यांना महत्व मिळणं अपरिहार्य आहे. आता युरोपमध्ये देखील कढीलिंबाची पावडर मिळते! या पावड़रची चव कशी असेल तशी असो पण या पावडरला जर थोडीशी आपल्या चवीची जोड दिली तर वेगळ्या प्रकारची कढीलिंबाची चटणी होइल. त्या निमित्यानं कढीलिंब पोटात जाईल.

गृहिणिंनो, ही कढीलिंबाची चटणी अवश्य तुमच्या संग्रही राहू द्यात.

साहित्य:

०१. दोन वाटया ताज्या कढीलिंबाची पानं
०२. अर्धी वाटी तिळ
०३. एक वाटी किसलेलं खोबरं
०४. अर्धी वाटी दाण्याचं (शेंगदाणा) कुट
०५. तिखटाच्या प्रमाणानुसार हिरव्या मिरच्या आणि मीठ

कृति:

कढीलिंबाची ताज़ी पानं आणि मिरचीचे तुकडे तेलावर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. तिळ, खोबरं भाजून घ्या. भाजलेल्या दाण्याचं (शेंगदाणा) कुट करा. कढीलिंब, तिळ, खोबरं आणि दाण्याचं कुट एकत्र करून मिक्सरवर बारीक वाटून घ्या. ही हिरवीगार चटणी खूप छान लागते.

मी तर करून बघितली आता तुम्ही करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा ....

कढीलिंब (Murraya Koenigii) वरील अजून काही वाचनीय लेख :

०१. Curry Leaf
०२. Comparison of Murraya Koenigii and Tribulus Terrestris
०३. Murraya Koenigii - A Video Clip
०४. Karapincha (Murraya Koenigii)
०५. Murraya Koenigii - A Research Article
Post a Comment